मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा… ५०० रुपयांत गॅस सिलिंडर आणि २०० युनिटपर्यंत मिळणार मोफत वीज

महागाईच्या भडक्यात होरपळून निघालेल्या सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

सरकार गरीबांना ५०० रुपयांत गॅस सिलिंडर आणि २०० युनिटपर्यंत मोफत वीजपुरवठा देणार आहेत. येत्या २७ फेब्रुवारीपासून या दोन योजना राज्यात सुरू केल्या जाईल, अशी घोषणा तेलंगणाचे मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांनी शुक्रवारी (२३ फेब्रुवारी) केली आहे.

या कार्यक्रमाला काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी देखील उपस्थित राहणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तेलंगणातील मुलुगु जिल्ह्यातील मेदारम येथे आदिवासी उत्सवादरम्यान मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी देवी-देवतांची पूजा केली. यानंतर त्यांनी राज्यातील जनतेसाठी काँग्रेस सरकार दोन मोठे निर्णय घेणार असल्याचं माध्यमांना सांगितलं.

“आम्ही निवडणूक प्रचारात तेलंगणातील जनतेला ६ आश्वासने दिली होती. यापैकी २७ फेब्रुवारीला आम्ही दोन आश्वासने पूर्ण करणार असून पांढरे शिधापत्रिकाधारकांना ५०० रुपयांचा एलपीजी सिलिंडर आणि २०० युनिटपर्यंत मोफत वीजपुरवठा सुरू केला जाईल”, असं मुख्यमंत्री रेड्डी म्हणाले.

“राज्य सरकारने याआधीच दोन आश्वासने पूर्ण केली असून, ज्यात महिलांसाठी सरकारी बसमध्ये मोफत प्रवास आणि गरिबांसाठी १० लाख रुपयांची आरोग्य योजना समाविष्ट आहे. ज्या दोन लाख रिक्त नोकऱ्या भरण्याचे आश्वासन देण्यात आले होते, त्यापैकी 25 हजार पदे सरकारने भरली आहेत, अशी माहिती देखील मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी दिली.

Leave a Comment