जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातून एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. वराड परिसरात लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या क्रुझर वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात नववधूसह तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात अन्य सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हे वऱ्हाड गुजरात मधील वापी येथून अकोल्याच्या दिशेनं जात होते. धरणगाव तालुक्यातील वराड जवळ क्रुझर वाहनाचे पुढचे चाक अचानक निखळले. वाहन वेगात असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि ही क्रुझर समोरील ट्रकला जोरदार धडकली. ही धडक इतकी भीषण होती की वाहनाचा अक्षरशः चक्काचूर झाला.
या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये नववधूचा समावेश असल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. पूजा रवी वाघळकर असं मृत पावलेल्या नववधूचं नाव आहे. तर दत्तू भागवत आणि जगदीश वाघळकर यांचाही या अपघातात मृत्यू झाला. या अपघातात सहा जण गंभीर जखमी झाले असून, त्यात एका लहान बालकाचा देखील समावेश आहे. या बालकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व जखमींना तातडीने जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अकोला येथील रहिवासी पूजा रवी वागडकर (वय २२) हिचा विवाह नुकताच गुजरात राज्यातील वापी येथे संपन्न झाला होता. लग्नानंतर पहिल्यांदाच ती आपल्या नातेवाईकांसह माहेरी अकोल्याला परतत होती. संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण होतं. मात्र नियतीला काही वेगळेच मान्य होते. बुधवारी २९ एप्रिल रोजी सकाळी ही क्रूझर गाडी (क्रमांक MH 30 AZ 4710) धरणगाव तालुक्यातील वराड गावाजवळून जात असताना अचानक गाडीचे एक चाक निखळले. वेग जास्त असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडीचा भीषण अपघात झाला.
सहाजण गंभीर जखमी
या अपघातात गाडीतील अन्य ६ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये प्रेम भारत वाकडकर ( वय २४), नितेश सुरेश काठोडे ( वय ३५), अमोल दामोदर गीते (वय ३५), रवी प्रभाकर वाघोडकर (वय ३२), तुळशीराम भीमराव भागवत (वय ६७) आणि १४ वर्षीय बालक अंश नितेश काठोडे यांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. जखमींना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
