शरद पवार यांच्या गटाचे आमदार, माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. प्राजक्त तनपुरे यांना राम गणेश गडकरी साखर कारखाना विक्री प्रकरणांत विशेष PMLA कोर्टाने समन्स जारी केलं होतं.
ईडीकडून दाखल केलेल्या गुन्ह्यांत 13 कोटी 37 लाखाचं मनी लॉड्रिंग झाल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. त्यांच्यावर 26 कोटी 32 लाखाची मागणी असलेला कारखाना 12 कोटी 95 लाखात या नाममात्र दरात विकल्याचा आरोप आहे. यातील आरोपी प्राजक्त तनपुरे, प्रसाद तनपुरे, सुभाष देशमुख, रणजित देशमुख यांना वैयक्तिक 2 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.
प्रसाद शुगर अलाईड अॅग्रो प्रॉडस्टस ली आणि तक्षशिला सिक्युरिटीज प्रा ली या कंपन्यांबाबत कोर्टाने अद्याप कोणता आदेश दिला नाही. त्यांच्यावर पदाचा दुरुपयोग करून प्रभावाचा वापर करून कारखान्याची 110 एकर जागा गिळंकृत केल्याचा गंभीर आरोप आहे. महाराष्ट्र स्टेट को ऑप बँकेनं MRA मार्ग पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या मूळ गुन्ह्यावर ईडीने ECIR दाखल केलाय.
प्राजक्त तनपुरे राज्यमंत्री असतानाच ईडीची कारवाई
ई़डीने प्राजक्त तनपुरे यांच्याविरोधात फेब्रुवारी 2022 मध्ये पहिल्यांदा कारवाई केली होती. त्यावेळी ते महाविकास आघाडी सरकारमध्ये ऊर्जा विभागाचे राज्यमंत्री होते. ईडीने प्राजक्त तनपुरे यांच्या राम गणेश गडकरी साखर कारखान्याची मालमत्ता जप्त केली होती.
त्यावेळी ईडीने तनपुरे यांच्या दोन जमिनी जप्त केल्या होत्या. त्या जागांची किंमत 7 कोटी 60 लाख इतकी होती. ईडीने 13 कोटी 41 लाखांची मालमत्ता जप्त केल्याची माहिती समोर आली होती. यामध्ये नागपूरमधील कारखान्याची 90 एकर जमीन तर अहमदनगरमधील 4 एकर जमिनीचा समावेश होता.
