संगमनेर(DSNews24/किरण पुरी) अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड धरणाचे पाणी संगमनेर तालुक्यातील शिंदोडीपर्यंत सोडण्यात यावे या मागणीसाठी जांबुतचे उपसरपंच १ मार्चपासून आमरण उपोषणाला बसले आहे.
उपोषणाला चार दिवस उलटून गेले तरीही शासन व प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नसल्याने संगमनेर व पारनेर तालुक्यातील मुळा नदी काठच्या गावांमधील शेतकऱ्यांची साकूर येथे नुकतीच बैठक पार पडली होती. सदर बैठकीत या मागणीची तात्काळ दखल घेतली नाही तर गुरूवार दि. ७ मार्च रोजी एकोणीस मैलावरील नाशिक – पुणे महामार्गावर रास्ता रोको करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला होता.
याबाबतचे निवेदनही प्रशासनाला दिले आहे. या पार्श्वभूमीवर संगमनेर येथे आज बुधवार दि. ६ मार्च रोजी दुपारी १.३० वाजता संगमनेरचे उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे यांचे अध्यक्षतेखाली प्रांत कार्यालयात बैठक आयोजीत करण्यात आली होती. या बैठकीत ठोस तोडगा निघाला नसल्याने आंदोलन कर्ते रास्ता रोकोवर ठाम राहिले होते.
परंतु १९ मैल खंदरमाळवाडी पुणे – नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन होणार असल्याने त्याठिकाणी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ लागू करण्यात आले आहे. याबाबतचा आदेश उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे यांनी जारी करण्यात आलाय.
७ मार्च रोजी सकाळी ८ वाजेपासून ते रात्री १० वाजेपर्यंत तसेच नाशिक – पुणे महामार्ग क्र. ६० वर मौजे हिवरगाव पावसा टोलनाका ते बोटाखिंड पर्यंत महामार्गावर तसेच महामार्गावर उजव्या व डाव्या अशा दोन्ही बाजूस २०० मिटर पर्यंत कलम १४४ चे प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहे.
