बुलढाणा – समृद्धी महामार्गावर चालकाच्या बेजबाबदारपणाचा एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. चालत्या बसमध्ये रिल्स बनवण्याच्या नादात चालकाचे नियंत्रण सुटल्याने खाजगी बस उलटून भीषण अपघात झाला. मेहकर टोलनाक्याजवळ झालेल्या या दुर्घटनेत एका दीड वर्षाच्या चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला असून, २० ते २५ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. चालकाच्या या जीवघेण्या करामतीमुळे प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही खाजगी लक्झरी बस समृद्धी महामार्गावरून जात असताना चालकाच्या कॅबिनमध्ये ७ ते ८ जण बसलेले होते. यावेळी बसचा चालक आणि क्लिनर मोबाईलवर ‘रिल्स’ बनवण्यात गुंग झाले होते. ड्रायव्हर चक्क गाडी चालवताना कॉलर वर करून नाचत होता आणि क्लिनर त्याचे चित्रीकरण करत होता. रिल्स बनवण्याच्या नादात चालकाचे वाहनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले. समोर मेहकरचा टोलनाका आला असतानाही वेगावर नियंत्रण न ठेवता, चालकाने अचानक गाडी वळवण्याचा प्रयत्न केला. यामुळे बस अनियंत्रित होऊन पलटी झाली आणि जवळच असलेल्या एका चारचाकी वाहनावर जाऊन आदळली.
या भीषण अपघातात एका दीड वर्षाच्या निष्पाप मुलीचा जागीच मृत्यू झाला. तसेच बसमधील २० ते २५ प्रवाशांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या धडकेत बाजूला उभ्या असलेल्या चारचाकी वाहनाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. प्रत्यक्षदर्शी प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, चालक वारंवार गाणी लावून स्टंट करत होता, ज्याकडे प्रवाशांनी लक्ष वेधूनही त्याने दुर्लक्ष केले
