शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या उमेदवाराची अद्याप अधिकृतपणे घोषणा झालेली नाही. तथापि, महायुतीचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे आणि महाविकास आघाडीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या नावाची चर्चा होत आहे.
शिर्डी मतदारसंघातील गेल्या सलग तीन निवडणुका शिवसेनेने जिंकल्या. त्यापूर्वी हा मतदारसंघ दिवंगत माजी खासदार बाळासाहेब विखे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असे. हा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर येथून २००९ साली पहिली निवडणूक शिवसेनेचे उमेदवार वाकचौरे यांनी जिंकली. त्यांनी काँग्रेसपुरस्कृत उमेदवार रामदास आठवले यांचा पराभव केला. २०१४ मध्ये मोदी लाटेत लोखंडे अवघ्या सतरा दिवसांत लोकसभेत गेले.
शिवसेना सोडून काँग्रेसच्या तिकिटावर उमेदवारी करणाऱ्या वाकचौरे यांचा पराभव झाला. विखे भाजपमध्ये आले आणि आठवले देखील केंद्रीय मंत्री झाले. २०१९ सालच्या निवडणुकीत या मतदारसंघात पुन्हा मोदी लाटेचा प्रभाव जाणवला. भाजपमध्ये आलेल्या मंत्री राधाकृष्ण विखे यांनी शेवटच्या दोन-तीन दिवसांत आपली यंत्रणा लोखंडे यांच्यामागे उभी केली आणि ते दुसऱ्यांदा खासदार झाले.
दरम्यानच्या काळात शिवसेना फुटली. लोखंडे शिंदे गटात राहिले अन् वाकचौरे उद्धव बा. ठाकरे सेनेत गेले. दोघांनाही या निवडणुकीतील उमेदवारीचे आश्वासन देण्यात आले आहे. गेल्या सलग तीन निवडणुका जिंकणाऱ्या शिवसेनेची या मतदारसंघात संस्थात्मक शक्ती नाही. याउलट येथे शुगर लाॅबीचा निर्विवाद प्रभाव आहे.
मात्र, गेल्या दोन निवडणुकांत येथील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील जनतेने लोकसभेत आणि विधानसभेत वेगवेगळे मतदान केल्याचे स्पष्टपणे दिसून आले. त्यामुळे संस्थात्मक ताकद नसताना देखील शिवसेनेने आपले वर्चस्व कायम ठेवले. कारण मागील दोन्ही निवडणुका लाटेवर झाल्या.
या वेळी अद्याप तरी कुठली लाट दिसत नाही. विधानसभा मतदारसंघनिहाय विचार करायचा झाल्यास अकोलेत आमदार किरण लहामटे आणि माजी आमदार वैभव पिचड हे दोघेही महायुती समर्थक आहेत. शिर्डीत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांचे वर्चस्व, तर कोपरगावात आमदार आशुतोष काळे आणि माजी आमदार स्नेहलता कोल्हे हे दोघेही महायुती समर्थक आहेत.
संगमनेरात काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांचे, तर नेवाशात आमदार शंकरराव गडाख आणि श्रीरामपुरात आमदार लहू कानडे हे तीन युती समर्थक आमदार आहेत. याचा अर्थ विधानसभानिहाय विचार केला, तर सामना बरोबरीचा आहे.
