बापरे! गरोदर मातांच्या पोषण आहारात सापडल्या अळ्या…

गरोदर महिलांच्या पोषण आहारात अळया सापडल्याचा धक्कादायक प्रकार शिरुर तालुक्यातील आंबळे गावात घडल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे.

यामुळे एकुणच गरोदर महिलांच्या जिवीताला धोका निर्माण झाला आहे. या प्रकरणावरून शिरुर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे आक्रमक झाले असून त्यांनी राज्य सरकारला फटकारले आहे.

अमोल कोल्हे म्हणाले, सत्ताधाऱ्यांचे लक्ष केवळ आणि केवळ निवडणुकीवर असल्यामुळे प्रशासन वाऱ्यावर सोडले आहे. नेमकं पोषण कोणाचे सुरू आहे हा प्रश्न आहे. गरोदर मतांचे आणि पोटातील बाळांचे पोषण होण्यासापेक्षा सत्ताधाऱ्यांच्या जवळच्या कंत्राटदारांचे पोषण सुरू आहे.

अमोल कोल्हे म्हणाले, बाजारातून जुना माल पडलेल्या भावाने उचलून चढ्या भावाने विकणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा.

बाजारातून एक्सपायरी डेट जवळ आलेला खराब होऊ शकणारा जुना माल खरेदी करायचा आणि तो चढ्या दराने कंत्राटातून विक्री करायचा, अशी साखळी समोर येत आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी कोल्हे यांनी केली.

शिरुर तालुक्यातील आंबळे येथे गरोदर महिलांसाठीच्या शिद्यामध्ये अळ्या व सोनकिडे आढळले आहेत. या आहारातील गुळ आणि काजुमध्ये किडे हे आढळले. हा पोषण आहार अनेक गरोदर महिलांना दिल्याचे देखील उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकारामुळे गरोदर महिलांचे आणि बाळाचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. गरोदर महिलांच्या जीवावर बेतण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.

Leave a Comment