देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे हे वाहू लागले आहेत. पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून सुप्रिया सुळे यांना तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आलीय.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे असून आता बारामतीमधून भारतीय गीग कामगार मंच तसेच बघतोय रिक्षावाला संघटनेकडून पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथे राहणाऱ्या शरद पवार यांना उमेदवारी दिल्याने आत्ता या रिक्षाचालक शरद पवार यांची जोरदार चर्चा सुरू आहे.
गीग कामगार मंच तसेच बघतोय रिक्षावाला संघटनेकडून शरद पवार यांच्यासहित पुणे जिल्ह्यात ४ उमेदवारांची घोषणा करण्यात आली. यात बारामतीमधून रिक्षाचालक शरद पवार यांना तर पुणे लोकसभा मतदार संघातून टेम्पो चालक मनोज वेताळ,मावळमधून कॅब चालक संतोष वालगुडे आणि शिरूर मधून फूड डिलिव्हरी बॉय स्वप्नील लोंढे यांना उमेदवारी जाहीर झाली. उमेदवारांच्या प्रचारार्थ १८ एप्रिल २४ रोजी प्रचार सभा घेऊन शक्ती प्रदर्शन करून बारामतीच्या उमेदवार शरद पवार यांचा अर्ज भरण्यात येणार आहे.
