ब्रेकिंग! एप्रिलमध्ये ‘या’ निवडणुका होणार….

वर्षभरापासून लांबणीवर पडलेल्या बाजार समित्या निवडणुकांसाठी अंतिम मतदार यादी सोमवार (दि.20) रोजी जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी जाहीर केली. यामुळे आता जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकांना वेग येणार आहे. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणूका लांबल्याने आता बाजार समिती निवडणुकीत सर्वच राजकीय पक्ष नशीब अजमावणार असल्याने बाजार समित्यांची निवडणूक रंगतदार आहेत. दरम्यान अंतिम मतदार यादीमध्ये नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत सदस्यांची नावे समाविष्ट करण्यात आल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी दिली.

जिल्ह्यातील नगर, पारनेर, राहुरी, राहाता, संगमनेर, अकोले, कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा, शेवगाव, पाथर्डी, जामखेड, कर्जत, श्रीगोंदा बाजार समितींवर संचालक मंडळांची मुदत संपल्याने गेल्या वर्षभरापासून याठिकाणी प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती. यापूर्वी बाजार समिती निवडणुकांच्या अनुषंगाने अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, कोविडची पहिली आणि दुसरी लाट, त्यानंतर पावसाळा आणि अन्य कारणामुळे बाजार समित्यांच्या निवडणूका पुढे ढकलण्यात आल्या होत्या.

दरम्यानच्या काळात झालेल्या नव्याने ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेले सदस्य व सोसायट्याचे नवीन संचालक व सदस्यांची नावे बाजार समित्यांच्या निवडणुकीत समाविष्ट करण्यात आले नव्हते. नवीन सदस्यांची नावे नसल्याने प्रकरण न्यायालयात गेले होते.

नव्याने निवडून आलेल्या सदस्यांची नावे समाविष्ट करुन तसेच 30 एप्रिलच्या अगोदर बाजार समित्यांच्या निवडणूका घेण्याचे न्यायालयाने निर्देश दिले. त्यानूसार कार्यवाही करून आता जिल्हा उपनिबंधकांनी 14 बाजार समित्यांच्या अंतिम मतदार यादी जाहीर केली आहे. मतदार यादी अंतिम झाल्याने येत्या 8 ते 10 दिवसांत 14 बाजार समित्यांच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार असल्याचे पुरी यांनी सांगितले.

Leave a Comment