तर भाजपकडून महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री फडणवीस नव्हे ‘हे’ होणार…..

एकेकाळी महाराष्ट्र भाजपचा(BJP) प्रमुख चेहरा असलेले विनोद तावडे हे राज्याच्या राजकारणात लवकरच कमबॅक करतील, अशा चर्चा अधुमधून सुरु असतात. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस असलेल्या तावडे यांनी निवडणुकांच्या काळात विविध राज्यांचे प्रभारी म्हणूनही काम केले आहे.

अलीकडेच त्यांच्यावर २०२४च्या लोकसभा निवडणुकीसाठीची रणनीती निश्चित करण्याच्यादृष्टीने गठित करण्यात आलेल्या समितीच्या प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली होती. केंद्राच्या राजकारणातील विनोद तावडे यांचे वाढते वजन पाहता ते भाजपचे महाराष्ट्रातील नवे मुख्यमंत्री असतील, अशी चर्चा अलीकडेच रंगली होती.

मात्र, विनोद तावडे यांनी ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीशी बोलताना या सगळ्या गोष्टींचा स्पष्टपणे इन्कार केला. मला महाराष्ट्रातील राजकारणात कोणताही रस नाही. मला केंद्रात राहूनच काम करायला आवडेल. महाराष्ट्रात भाजप देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करेल. आता ‘ओन्ली राष्ट्र, नो महाराष्ट्र’, असे सांगत विनोद तावडे यांनी आपण मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत नसल्याचे स्पष्ट केले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून देवेंद्र फडणवीस यांना भाजपकडून केंद्रात बोलावून घेतले जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यांच्याऐवजी केंद्राच्या राजकारणात राहून पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्याशी जवळीक निर्माण झालेले विनोद तावडे यांना मुख्यमंत्री म्हणून भाजपमध्ये पाठवले जाईल, असेही अनेकांकडून सांगितले जात होते. परंतु, आता विनोद तावडे यांनीच मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदात कोणताही रस नसल्याचे स्पष्ट केले आहे

Leave a Comment