अकोले तालुक्यात मुळा नदी पाणलोट क्षेत्रात काल मंगळवारी दिवसभर संततधार पाऊस सुरू असल्याने मुळा नदीच्या प्रवाहामध्ये वाढ होत आहे. मुळा नदीचा प्रवाह हा पिंपळगाव खांड मध्ये स्थिरावत असून 600 दलघफू क्षमतेच्या या धरणातील पाणीसाठा 427 दशलक्ष घनफूट झाला आहे. पावसाचा जोर टिकून राहिल्यास हे धरण काही तासांतच ओव्हरफ्लो होण्याची आशा निर्माण झाली आहे. दिवसभराच्या संततधार पावसामुळे आदिवासी भागात डोंगरदर्या आता ओल्या चिंब झाल्या आहेत. ओढे नाले खळखळून वाहू लागले आहेत. योग्य पाऊस सुरू झाल्याने भात पिकाच्या लागवडी आता सुरू झाल्या आहेत.
काल मंगळवारी पहाटेपासूनच पाणलोट क्षेत्रात पावसाने जोर धरला. दिवसभर पावसाचे सातत्याने टिकून जोराच्या सरी कोसळत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुळा नदीच्या प्रवाहामध्ये वाढ होत आहे. मुळा नदीचा प्रवाह हा पिंपळगाव खांड मध्ये स्थिरावत असून पिंपळगाव खांड धरणाचा पाणीसाठा 427 दशलक्ष घनफूट झाला आहे.
धरण ओव्हरफ्लो होण्याची आशा निर्माण झाली आहे. यामुळे धरणातून नदी पात्रात सुरू असलेले पिण्याचे पाण्याचे रोटेशन बंद करण्यात आल्याचे शाखा अभियंता सूर्यवंशी यांनी सांगितले. रात्री उशिरा पिंपळगाव खांड धरण ओव्हरफ्लो होऊन पाण्याचा प्रवाह मुळा धरणाकडे झेपावणार आहे.
