लखनऊ : लग्नाचं एक अजब प्रकरण समोर आलं आहे. यात लग्नाच्या दिवशी वधू रात्रभर वराची वाट पाहत राहिली, पण वराचा किंवा लग्नाच्या वरातीचा काही पत्ताच लागला नाही. बराच वेळ वाट पाहिल्यानंतर मुलीच्या लग्नाला उपस्थित असलेले पाहुणे आणि लोक आपापल्या घरी जाऊ लागले. हे सर्व पाहून नवरीला खूप वाईट वाटलं. ही घटना उत्तर प्रदेशच्या शाहजहांपूरमध्ये घडली आहे.
खरंतर लग्नाची वरात गुरुवारी म्हणजेच 4 जुलैला येणार होती. या लग्नाला नातेवाईकांपासून जवळच्या व्यक्तींपर्यंत सर्वजण आले होते. मुलीच्या घरच्यांनी लग्नाची पूर्ण तयारी केली होती. फक्त लग्नाची वरात येण्याची आणि वराचं मोठ्या थाटामाटात स्वागत होण्याची वाट पाहिली जात होती. पण तिथे उपस्थित प्रत्येकाचं हे स्वप्न अधुरंच राहिलं. हे संपूर्ण प्रकरण शाहजहांपूरच्या निगोहचं आहे. जलालाबाद येथील रहिवासी असलेल्या मुलीचं लग्न ठरलं होतं आणि गुरुवारी लग्नाची वरात येणार होती. मात्र रात्री उशिरापर्यंत लग्नाची वरात न आल्याने मुलीच्या कुटुंबीयांनी मुलाच्या कुटुंबीयांना फोन केला. पण कॉलला प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर बराच वेळ गेल्याने लग्नासाठी आलेले पाहुणेही परत गेले.
हिंदुस्थानच्या रिपोर्टनुसार, जेव्हा वर आणि पाहुणे लग्नाच्या वरातीसह निघणार होते, तेव्हा एटा येथील नवरदेवाची गर्लफ्रेंड त्याच्या घरी पोहोचली आणि लग्नासाठी हट्ट करू लागली. त्यामुळे वरात पोहोचू शकली नाही. प्रकरण इथंच थांबलं नाही. शुक्रवारी पहाटे ४ वाजता वधूने वराला फोन केला आणि म्हटलं, की आपण लग्न करू, तू फक्त तुमच्या कुटुंबातील सदस्य आणि काही नातेवाईकांना घेऊन ये. मी वाट पाहत आहे
हे ऐकून मुलगा खूप खूश झाला आणि त्याने आपल्या कुटुंबीयांना सांगितलं की मुलगी आणि तिचे कुटुंबीय अद्याप लग्नासाठी तयार आहेत. यानंतर मुलगा काही नातेवाईकांसह मुलीच्या घरी पोहोचला. मात्र, नवरदेव आणि त्याचे साथीदार येताच मुलीने पोलिसांना बोलावलं. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून त्याला अटक केली. त्यानंतर दोन्ही बाजूचे लोक बराच वेळ एकमेकांशी चर्चा करत होते. सायंकाळी उशिरा पोलिसांनी त्या नवरदेवाला सोडून दिलं.
