सावधान! पुण्यासाठी पुढील काही तास संकटाचे

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि आसपासच्या परिसरात पुढच्या काही तासांसाठी भारतीय हवामान खात्याने पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून 27 हजार क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

पाऊस वाढला तर यापेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता आहे. पुण्यातली परिस्थिती बघता लष्कर आणि एनडीआरएफही अलर्ट मोडवर आहेत, तसंच नागरिकांनीही सतर्क राहून काळजी घ्यायचं आवाहन करण्यात आलं आहे.

खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे शनिवारी संध्याकाळच्या सुमारास डेक्कन परिसरातील नदीपात्रात पाणीपातळी वाढली आहे, त्यामुळे पुलाची वाडी आणि प्रेमनगरमधल्या सुमारे 100 वीज ग्राहकांचा वीजपुरवठा सुरक्षेच्या कारणासाठी बंद करण्यात आला आहे. तसंच सिंहगड रस्त्यावरील एकतानगरीमधल्या दोन सोसायट्यांमध्ये पुराचे पाणी शिरल्यामुळे 15 वीजग्राहकांचा वीजपुरवठा सुरक्षेच्या दुष्टीने बंद ठेवण्यात आला आहे.

एकता नगरी आणि परिसरातील नागरिकांना महापालिकेने नोटीस दिली आहे. पाणी भरण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांना शेल्टर होममध्ये जायच्या सूचना पुणे महापालिकेने केल्या आहेत. तसंच पार्किंगमध्ये दुचाकी किंवा चारचाकी असतील तर त्याही सुरक्षित स्थळी हलवण्याचं आवाहन महापालिकेने नागरिकांना केलं आहे.

Leave a Comment