संगमनेर(DSNews24/किरण पुरी) महाराष्ट्र सरकारने राज्यभरात दीड लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपयांची आर्थिक मदत देणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली आहे. या योजनेसाठी राज्यभरात लाखो महिलांकडून अर्ज केले जात आहेत. पण काही ठिकाणी महिलांना अर्ज करताना अडचणी येत आहेत. या योजनेची नीट अंमलबजावणी व्हावी यासाठी सरकारने आता मोठं पाऊल उचललं आहे.
सरकार आता लाडकी बहीण योजनेचं काटेकोर पालन व्हावं यासाठी पूर्ण लक्ष केंद्रीत करणार आहे. विशेष म्हणजे राज्य सरकारने लाडकी बहीण योजना राबवण्यासाठी समितीची स्थापना केली आहेत. ही योजना काटेकोरपणे राबवण्यासाठी सरकारकडून हे पाऊल उचलण्यात आलं आहे. या योजनेची अंमलबजावणी काटेकोरपणे व्हावी यासाठी सरकारकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी विधानसभा क्षेत्र निहाय समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयानूसार अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी संगमनेर विधानसभा क्षेत्रासाठी समिती जाहीर केली आहे. या समितीवर अशासकीय सदस्य म्हणुन संगमनेर तालुक्यातील साकूर येथील रऊफ शेख यांची पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे यांच्या शिफारसीने जिल्हाधिकारी यांनी नियुक्ती केली आहे.
रऊफ शेख हे साकूर पठारभागातील सामाजिक कार्यकर्ते असुन विखे पा.यांचे विश्वासु कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. नामदार विखे पा.यांच्या मार्गदर्शनामध्ये या योजनेच्या सुरुवातीपासुनच जास्तीत जास्त नोंदणी घडवुन आणण्यासाठी ते प्रयत्नशील होते. लाडकी बहीण योजनेचा प्रचार व प्रसार करण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला आहे. सामाजिक कामात ते नेहमीच पुढाकार घेत असतात. ना. विखे पाटील यांच्या माध्यमातुन विकासकामे करण्यासाठी त्यांचा नेहमी प्रयत्न असतो. याच कामांची दखल घेऊन पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पा.यांनी त्यांची समितीवर निवड केली आहे.
विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील जास्तीत जास्त महिला भगिणींना या योजनेचा लाभ मिळवुन द्यायचा असुन एकही पात्र महिला या योजनेपासुन वंचित राहणार नाही. यासाठी पुढील काळात काम करायचे असल्याची प्रतिक्रिया रऊफ शेख यांनी दिली आहे. तसेच त्यांनी ही संधी दिल्या बद्दल ना. विखे पाटील यांचे आभार मानले आहेत.
या निवडीबद्ल रऊफ शेख यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असुन साकूर पठारभागात ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे.
