राज्यात सुरू असलेल्या पावसाचा जोर ओसरला असून, अनेक ठिकाणी ढगाळ हवामानासह ऊन-सावल्यांचा खेळ सुरू आहे. आजपासून (ता. ६) राज्याच्या अनेक भागात पाऊस उघडीप देण्याची शक्यता आहे.
कोकण, घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार सरींची तर विदर्भात विजांसह हलक्या पावसाची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे.
आग्नेय राजस्थान आणि परिसरावरील तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निवळू लागले आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानमधील फालोदी ते कमी दाबाच्या क्षेत्राचे केंद्र ते चुर्क, पुरुलिया, दिघा, ते पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. कमी दाबाच्या केंद्रापासून उत्तर ओडिशा पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. दक्षिण गुजरातपासून ते उत्तर केरळ किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.
सोमवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये घाटमाथ्यावरील ताम्हिणी येथे उच्चांकी २१० मिलीमीटर पावसाची नोंद झाला. नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा येथे २०० मिलीमीटर, तर लोणावळा येथे १९० मिलीमीटर, वळवण येथे १७०, जव्हार येथे १५० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर काही ठिकाणी १०० मिलिमीटर पेक्षा अधिक पाऊस झाला. राज्यात पावसाने उघडीप दिली असून, ऊन सावल्यांचा खेळ पहायला मिळाला.
राज्यातील पावसाचा जोर ओसरल्यानंतर अनेक भागात पावसाची उघडीप मिळण्याची शक्यता आहे. आज (ता. ६) कोकणातील रायगड, रत्नागिरीसह पुणे, सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार सरींची ‘येलो अलर्ट’ आहे. तर विदर्भात विजांसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात पावसाची उघडीप मिळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
मुसळधार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा.
विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.
