मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीबाबत नवा गौप्यस्फोट केला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोनवर बोलत-बोलत आपण गुवाहाटीला गेलो होतो, असा गौप्यस्फोट एकनाथ शिंदे यांनी केला.
एकनाथ शिंदे यांनी ‘एएनआय’ वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. या मुलाखतीत एकनाथ शिंदे यांनी सविस्तर भूमिका मांडली. “आम्ही गुवाहाटीला जाणं ही आमची रणनीती होती. मी लपूनछपून गेलो नाही. मी खुलेआमपणे गुवाहाटीला गेलो. मी बात करत-करत गेलो. उद्धव ठाकरे यांचा मला फोन आला. मी रस्त्यात होतो. मी त्यांच्यासोबत फोनवर बोलत-बोलत गेलो”, असा खुलासा एकनाथ शिंदे यांनी केला.
“उद्धव ठाकरेंनी मला खूप आव्हान दिलं की, परत येऊन दाखव. वरळीहून येणार, लाखो लोकं येणार, रस्ता जाम करणार, आमदारांना विधान भवनात जाऊ दिलं जाणार नाही, अशा धमक्या दिल्या गेल्या. मी सांगितलं, मी सुद्धा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा कार्यकर्ता आहे. तुम्ही कुणाला घाबरवत आहात? ज्याने पक्षासाठी दिवसरात्र काम केलं, मी घाबरणाऱ्यांमधील नाही”, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
“मी लहानपणापासून पक्षासाठी काम करत आहे. त्यामुळे मला हे सर्व नको होतं. पण कुणाला हवं असेल तर ती माझी जबाबदारी नव्हती. मी तिथून आलो. हेलिकॉप्टर तिथे बाजूला होतं. मला हेलिकॉप्टरमध्ये बसायला सांगितलं. मी हेलिकॉप्टरमध्ये बसलो नाही. मी रस्ते मार्गाने आलो आणि जिथे पोहचायचं आहे तिथे पोहोचलं. कुणाला घाबरवत आहात? ज्याने पक्षासाठी दिवस-रात्र काम केलं”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
