नगर, पुण्यासह 21 जिल्ह्यांत पुढील आठ दिवस मोठं संकट 

अहमदनगर – 3 ते 10 सप्टेंबरपर्यंत आठवडाभर खान्देश, विदर्भ आणि नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या 21 जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता कायम आहे. दरम्यान, उद्या गुरुवारी 5 सप्टेंबरला बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असून यामुळे राज्यात सप्टेंबरमधील पावसाच्या आवर्तनासाठी पूरक ठरणार असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.

चंद्रपूरजवळ केंद्रित अतितीव्र कमी दाबाचे क्षेत्र आता पश्चिमेकडे सरकल्यामुळे आज बुधवारपासून मराठवाड्यातील बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड या पाच जिल्ह्यांत पावसाचा जोर कमी होईल. तेथे केवळ तुरळक ठिकाणीच किरकोळ, हलक्या ते मध्यम पावसाचीच शक्यता आहे. तर हिंगोली, जालना, व छत्रपती संभाजीनगर या तीन जिल्ह्यात बुधवार दि .4 ते मंगळवार 10 सप्टेंबरपर्यंत मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

मान्सूनचा मुख्य आस काहीसा दक्षिणेकडे सरकलला आहे. अरबी समुद्रात संपूर्ण पश्चिम किनारपट्टी समांतर दक्षिणोत्तर ऑफ-शोअर ट्रफची उपस्थिती आहे. तसेच अरबी समुद्रात समुद्रसपाटीपासून दिड किमी उंचीपर्यंत ताशी 48 किमी वेगाचे येणारे आर्द्रता युक्त पश्चिमी वारे, वेग कमी होवून प्रत्यक्षात ताशी 20-25 किमी वेगाने मुंबई किनारपट्टीवर आदळत आहे. या सर्वांच्या एकत्रित परिणामातून मुंबईसह संपूर्ण कोकणातील 7 जिल्ह्यात मंगळवार 3 सप्टेंबर ते 10 सप्टेंबरपर्यंत आठवडाभर अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र व विदर्भ- मध्यम ते जोरदार पाऊस राहणार असून 10 सप्टेंबरपर्यंत आठवडाभर खांदेश, विदर्भ आणि नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर अश्या 21 जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता ही कायमच आहे.

Leave a Comment