महाराष्ट्र विधानसभेची नोव्हेंबरच्या दुसर्या आठवड्यात घेतली जाऊ शकते, असे सुतोवाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी केले. या निवडणुकीत महायुतीतील घटक पक्षांमध्ये कोण किती जागा लढविणार, याबाबतचा अंतिम निर्णय येत्या आठ ते दहा दिवसांत जाहीर करण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
288 सदस्यीय राज्य विधानसभेसाठी दोन टप्प्यांत निवडणूक घेतली जाऊ शकते, असे शिंदे आपल्या शासकीय ‘वर्षा’ निवासस्थानी पत्रकारांशी अनौपचारिक वार्तालाप करताना सांगितले.
शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी काँगे्रसचा समावेश असलेले महायुतीचे सरकार सातत्याने विकास आणि कल्याणकारी योजनांवर काम करीत आहे आणि या योजनांना राज्यातील जनतेचा प्रचंड पाठिंबा मिळत आहे. आम्ही जागा वाटपावर चर्चा सुरू केली आहे. यासाठी गुणवत्ता आणि विजयाची खात्री हा महत्त्वाचा असणार आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.
लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील महिलांचा महायुतीला मोठा प्रतिसाद मिळत आहे. माझे सरकार सर्वसामान्यांचे आहे. विकास आणि कल्याणकारी योजना यात आम्ही अचूक समतोल साधला आहे. कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमाचा भाग म्हणून आमच्या सरकारने दीड लाख युवकांना नियुक्तिपत्रे दिली असून, त्या अंतर्गत त्यांना 6, 10 हजार स्टायपंड दिले जात आहे. या योजनेंतर्गत राज्यातील 10 लाख युवकांना समाविष्ट करण्यावर आमचा भर असणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
