सरपंच – उपसरपंचांच्या मानधनात वाढ, ग्रामसेवक पदाच नाव बदललं, शिंदे सरकारचा मोठा निर्णय 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यास अवघे काही दिवस बाकी असताना होत असलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नेमके काय निर्णय घेण्यात येणार, याबाबत उत्सुकता होती.

आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सरपंच-उपसरपंचांचे वेतन वाढवण्यासह अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

राज्यातील सरपंच आणि उपसरपंचांच्या वेतनात दुप्पटीने वाढ करण्यात आली आहे. तसंच ग्रामसेवकपदाचं नाव बदलून ग्रामविकास अधिकारी असं करण्यात आलं असल्याचंही मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं आहे.

सरपंच आणि उपसरंपचांचे मानधन नेमकं किती वाढणार?

त्यामुळे आता ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या 2000 पर्यंत आहे, त्या सरपंचाचे मानधन 3000 रुपयावरुन 6000 रुपये करण्यात येणार आहे. तर ज्या उपसरंपचाचे मानधन 1000 वरुन 2000 रुपये करण्यात येणार आहे.

तसेच ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या 2000 ते 8000 पर्यंत आहे, त्या सरपंचाचे मानधन 4000 रुपयावरुन 8000 रुपये करण्यात आली आहे. तर उपसरपंचाचे मानधन 1500 रुपयावरुन 3000 रुपये करण्यात आले आहे.

तसेच ज्या ग्रामपंचायतींची लोकसंख्या 8000 पेक्षा जास्त आहे, त्या सरपंचाचे मानधन 5000 रुपयावरुन 10000 रुपये करण्यात आले आहे. तर उपसरपंचाचे मानधन रु. 2000 रुपयावरुन 4000 रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या मानधनवाढीमुळे राज्यशासनावर वार्षिक 116 कोटी रुपयांचा आर्थिक भार पडणार आहे.

Leave a Comment