पारनेर (DSNews24/किरण पुरी) पारनेर तालुक्याच्या पठार भागाला एक टीएमसी पाणी मिळावे, शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी, डिंबे – माणिकडोह बोगद्याचे काम त्वरित सुरू करावे अशा विविध मागण्यासंदर्भात भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयासमोर २४ सप्टेंबरपासून साखळी उपोषण सुरू केलंय. तसेच गेल्या तीन दिवसांपासून कुठलीही दखल प्रशासनाने घेतली नसल्याने अखेर चौथ्या दिवशी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाडेकर, राज्य संपर्क प्रमुख अशोक आंधळे, संघटक बाळशिराम पायमोडे यांनी आमरण उपोषण सुरू केलंय. मात्र उपोषणाच्या चौथ्या दिवशी अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम समिती सभापती काशिनाथ दाते सर व भाजपचे अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष वसंतराव चेडे यांनी उपोषणस्थळी भेट देत जाहिर पाठिंबा दिलाय.
यावेळी सर्व मागण्यांची वस्तूस्थिती जाणून घेतली. तसेच पारनेर करांच्या दृष्टीने पाण्याचा प्रश्न अत्यंत जिव्हाळ्याचा असल्याचे काशिनाथ दाते सर यावेळी म्हणाले.
तसेच उपोषणकर्त्यांच्या सर्व मागण्या अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमोर मांडून तातडीने मंत्रालयात संबंधित विभागाची बैठक घेण्यास मंत्री विखे यांना विनंती करणार असल्याचे यावेळी श्री. दाते सर यांनी संतोष वाडेकरांना सांगितले. तसेच या बैठकीला विशेष शिष्टमंडळ उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे लवकरच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील या उपोषणाकडे लक्ष देण्याची शक्यता आहे.
या मागणीसाठी सुरू आहे उपोषण…
पश्चिम वाहिन्यांचे अतिरिक्त वाहून जाणारे पाणी वळवून नगर जिल्हयातील दुष्काळी भगाला देण्यात यावे, कान्हूरपठार, पुणेवाडी, जातेगांव, राळेगणसिध्दी, शहाजापुर उपसा सिंचन योजनेला मान्यता देऊन कार्यान्वीन कराव्यात, डिंबे माणिकडोह बोगद्याचे काम त्वरीत सुरू करण्यात यावे, अटी, शर्ती न लावता शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती द्या, नियमित कर्जदारांना प्रोत्साहनपर देण्यात येणारे ५० हजारांचे अनुदान ठराविक शेतकऱ्याऱ्यांना मिळाले, उर्वरीत शेतकऱ्यांना ते मिळावे. यासंबंधीच्या मागण्या भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या आहेत.
