निवेदिका अश्विनी पुरी यांचा ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते सन्मान

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील साकूर जवळील बिरेवाडी येथील रहिवासी असलेल्या निवेदिका अश्विनी पुरी यांना ‘साई प्रेरणा गौरव पुरस्कार 2026’ अंतर्गत उत्कृष्ट निवेदिका म्हणून सन्मानित करण्यात आले. हा मानाचा पुरस्कार ‘माहेरची साडी’ चित्रपटातून घराघरांत पोहोचलेल्या ज्येष्ठ मराठी अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमात पुरस्कार स्वीकारण्याबरोबरच संपूर्ण कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुराही अश्विनी पुरी यांनी समर्थपणे सांभाळली. त्यांच्या ओघवत्या, आत्मीयतेने भरलेल्या आणि प्रभावी निवेदनामुळे कार्यक्रमाला एक वेगळीच उंची लाभली. त्यांच्या सुसंवादी शैलीने आणि प्रभावी शब्दफेकीने उपस्थितांची मने जिंकली.

विशेष म्हणजे, अभिनेत्री अलका कुबल यांनीही अश्विनी पुरी यांच्या सूत्रसंचालनाचे मनापासून कौतुक करत त्यांच्या निवेदनशैलीची विशेष प्रशंसा केली. त्यांच्या या कौतुकामुळे अश्विनी पुरी यांच्या कार्याला आणखी एक मानाची पावती मिळाली.

कार्यक्रमानंतर अश्विनी पुरी यांनी अभिनेत्री अलका कुबल यांची विशेष मुलाखत घेतली. या संवादामध्ये अलका कुबल यांनी आपल्या अभिनय प्रवासातील अनेक संस्मरणीय अनुभव, आठवणी आणि जीवनातील प्रेरणादायी विचार मनमोकळेपणाने व्यक्त केले. हा संवाद उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरला.

‘साई प्रेरणा गौरव पुरस्कार 2026’ प्राप्त झाल्याने तसेच ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते सन्मानित होण्याचा बहुमान मिळाल्याने अश्विनी पुरी यांच्यावर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Comment