साकूरला दमदार पाऊस ; बळीराजा सुखावला, पेरणीसाठी पोषक वातावरण

संगमनेर(DSNews24 /किरण पुरी) तालुक्यातील साकूर परिसरात रविवारी दुपारनंतर वरुणराजाने दमदार हजेरी लावत एक तासाहून अधिक काळ मुसळधार पाऊस बरसला. या पावसामुळे परिसरातील शेतकरी आनंदित झाले असून शेतांमध्ये पेरणीसाठी आवश्यक ओलावा निर्माण झाला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंतेत होता. त्यातच पठार भागात तीव्र पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र रविवारी सकाळपासून ढगाळ वातावरण आणि उकाडा जाणवत असतानाच दुपारनंतर अचानक सुरू झालेल्या जोरदार पावसाने परिसराला दिलासा दिला. पावसानंतर वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांनाही उष्णतेपासून दिलासा मिळाला.

साकूर, बिरेवाडी, मांडवे बुद्रुक, शिंदोडी, जांबुत बुद्रुक व खुर्द, हिवरगाव पठारसह आदि गावांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. अनेक शेतांमध्ये पाणी साचले होते. या पावसामुळे पेरणीसाठी आवश्यक ओलावा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Leave a Comment