विधानसभा निववडणुकीआधी शरद पवारांनी रणनिती आखायला सुरूवात केली आहे. पुणे जिल्ह्यात नव्याने पक्षाला उभं करण्यासाठी त्यांनी रणनिती आखली आहे. जुन्या सहकाऱ्यांच्या भेटीगाठी ते घेत आहेत.
आज शरद पवार पुण्यात आहेत. पुण्यातील मोदी बागेत असणाऱ्या शरद पवारांच्या निवास्थानी नेते आणि कार्यकर्त्याची भेटीसाठी गर्दी झाली आहे. यातच अजित पवार गटाचे दोन नेते शरद पवारांच्या भेटीला पोहोचले आहेत. त्यामुळे पुण्यात आणि सोलापुरात राजकीय बदलाचे संकेत दिसत आहेत. दोन बडे नेते शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले आहे.
दोन बडे नेते शरद पवारांच्या भेटीला
अजित पवार गटाचे दोन मोठे नेते शरद पवारांना भेटण्यासाठी आले आहेत. सोलापूरमधील माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबन शिंदे हे शरद पवारांना भेटण्यासाठी आले आहेत. बबन शिंदे पुन्हा शरद पवार गटात येण्यासाठी इच्छुक आहेत. पिंपरी चिंचवडचे अजित पवार गटाचे नेते विलास लांडे हे देखील शरद पवारांच्या भेटीला पोहोचले आहेत.
विलास लांडे यांनी मागे भोसरी विधानसभेची निवडणूक लढवली होती. विलास लांडे शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची माहिती आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या दोन नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने हे दोघेही शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
