पारनेर (DSNews24/किरण पुरी) गेल्या सात दिवसांपासून पारनेर तालुक्याच्या पठार भागाला एक टीएमसी पाणी मिळावे, शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी, डिंबे – माणिकडोह बोगद्याचे काम त्वरित सुरू करावे अशा विविध मागण्यासंदर्भात भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक संतोष वाडेकर, राज्य संपर्क प्रमुख अशोक आंधळे, संघटक बाळशिराम पायमोडे यांचं आमरण उपोषण सुरू आहे. मात्र अद्यापही प्रशासनाला जाग आली नाही. तसेच प्रशासनाचा एकही अधिकारी उपोषणस्थळी फिरकला देखील नाही. तसेच उपोषणकर्त्यांची प्रकृती देखील खालावत चालली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. तसेच जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सोडणार नसल्याची भूमिकाच आता उपोषणकर्त्यांनी घेतलीय. त्यामुळे उपोषण लांबणीवर पडणार असल्याची शक्यता आहे.
मात्र आता प्रशासनाने उपोषणाची दखल न घेतल्याने संतोष दादाभाऊ वाबळे या शेतकऱ्याने उपोषणकर्त्यांच्या मागण्यांची येत्या दोन दिवसांत तोडगा काढला नाहीतर पारनेर तहसील कार्यालयात वार – गुरूवार दि. ३ / १० / २०२४ रोजी सकाळी ११ वाजता आत्मदहन करण्याचा इशाराच दिला आहे. याबाबतचे निवेदन पारनेरचे तहसीलदार गायत्री सौंदाणे यांना दिले आहे. यावेळी वसंत साठे, अविनाश देशमुख, संपतराव कळसकर, प्रविण खोडदे, अब्बास मुजावर, अनिल सोबले, मनोज तामखडे आदि शेतकरी उपस्थित होते.
“या” आहेत मागण्या
पश्चिम वाहिन्यांचे अतिरिक्त वाहून जाणारे पाणी वळवून नगर जिल्हयातील दुष्काळी भगाला देण्यात यावे, कान्हूरपठार, पुणेवाडी, जातेगांव, राळेगणसिध्दी, शहाजापुर उपसा सिंचन योजनेला मान्यता देऊन कार्यान्वीन कराव्यात, डिंबे माणिकडोह बोगद्याचे काम त्वरीत सुरू करण्यात यावे, अटी, शर्ती न लावता शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती द्या, नियमित कर्जदारांना प्रोत्साहनपर देण्यात येणारे ५० हजारांचे अनुदान ठराविक शेतकऱ्याऱ्यांना मिळाले, उर्वरीत शेतकऱ्यांना ते मिळावे. यासंबंधीच्या मागण्यांसंदर्भात भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच उपोषण सुरू आहे.
तसेच उपोषणस्थळी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी भेटी देखील दिल्या आहेत. त्याचबरोबर उपोषणकर्त्यांच्या मागण्या संदर्भात तातडीने तोडगा निघण्यासाठी शिष्टमंडळाने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी येथे जाऊन भेट घेत निवेदन देखील दिले आहे. तसेच या शिष्टमंडळाने अण्णांसमोर सर्व वस्तूस्थिती मांडत याकडे लक्ष घालण्याची मागणी देखील केलीय.
मात्र प्रशासनासह राज्यकर्त्यांना अद्यापही जाग आली नाही. त्यामुळे शेतकरी वर्गात संतापाची लाट पसरली आहे. मात्र आता या आंदोलनाला वेगळे वळण लागले असून संतोष वाबळे या शेतकऱ्याने येत्या दोन दिवसात तोडगा काढा अन्यथा तहसील कार्यालयातच आत्मदहनाचा इशारा दिला आहे. उपोषणाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असून येत्या दोन दिवसांत आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे.
