भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी विधानसभेआधी पक्षाला रामराम करून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. पुण्यात मेळाव्याआधी हर्षवर्धन पाटलांची कन्या अंकिता पाटील यांनीही भाजयुमोच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. अंकिता पाटील यांनी वडील हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत शरद पवारांची भेट घेतली होती. अंकिता पाटील-ठाकरे या पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांनी पदाचा राजीनामा देत असल्याचं सांगितलं.
मुंबईत हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार यांची एक तास चर्चा झाली होती. या भेटीवेळी हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत अंकिता पाटील यासुद्धा उपस्थित होत्या. या भेटीनंतर हर्षवर्धन पाटलांचे चिरंजीव राजवर्धन पाटील आणि कन्या अंकिता पाटील यांनी व्हॉटसअप स्टेटसला तुतारीचं चिन्ह ठेवलं होतं. त्यामुळे इंदापूर मतदारसंघात जोरदार चर्चा रंगली होती. तसंच कार्यकर्त्यांकडून इंदापूरमध्ये बॅनरबाजीही केली जात आहे.
