बाळासाहेब थोरातांना भाजपमध्ये यायचं…….?, विखे – थोरातांमध्ये जुंपली 

संगमनेर विधानसभा मतदारसंघावरून विखे आणि थोरात यांच्यात चांगली जुंपली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी थेट सुजय विखेच काय, त्यांचे राधाकृष्ण विखे यांनी संगमनेरमधून लढावं, असं आव्हान दिलं होतं.

यावर भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे यांनी मतदारसंघ ही कोणाची मक्तेदारी नाही. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही, कोणाच्या नावानं ताम्रपट घेऊन आलेलं नाही, असा टोला लगावला.

संगमनेर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढण्याची इच्छा असल्याचं माजी खासदार सुजय विखे यांनी म्हटलं होतं. यानंतर विखे कुटुंबियांचे बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ला असलेल्या संगमनेर मतदारसंघात दौरे वाढले आहेत. मंत्री विखे(Radhakrishna Vikhe) यांनी संगमनेर मतदारसंघ पिंजून काढत असून, तिथं ताकद वाढवत आहेत.

विखे पिता-पुत्रांचे संगमनेर मतदारसंघात वाढलेल्या दौऱ्यावर काँग्रेस(Congress) नेते बाळासाहेब थोरात यांनी, संगमनेर विधानसभा मतदारसंघात सुजय विखे यांच्याऐवजी त्यांचे पिताश्री भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे यांनी निवडणूक लढवावी, असं आव्हान दिलं. तसंच बाळासाहेब थोरात यांनी त्यांची कन्या डाॅ. जयश्री थोरात संगमनेरमधून निवडणूक लढणार की, नाही लढणार यावर ती निर्णय घेईल. तिचं काही अजून ठरलेलं नाही, असं म्हटलं आहे.

बाळासाहेब थोरातांनी दिलेल्या आव्हानावर मंत्री राधाकृष्ण विखे यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिले. राधाकृष्ण विखे यांनी आम्ही संगमनेरमध्ये उभं राहावं, ही जनतेची इच्छा आहे. इथं तुमच्या ईच्छेला महत्त्व नाही. मतदारसंघ कोणाची जबाबदारी नाही, तो जनतेचा आहे. ही काय प्रायव्हेट कंपनी नाही. कोणाच्या नावे ताम्रपट लिहिलेलं नाही, असा टोला लगावला.

भाजपमध्ये यायचे आहे का?

काँग्रेस आमदार बाळासाहेब थोरात यांनी स्वतः निवडून येण्याचं पाहाव. शिर्डी विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवाराची काळजी करण्याचं कारण नाही. तशी करत असेल, तर त्यांना भाजपमध्ये यायचं आहे का? असा टोला राधाकृष्ण विखे यांनी लगावला.

Leave a Comment