शरद पवारांकडून रतन टाटांना श्रद्धांजली, म्हणाले प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी…..

उद्योगपती व टाटा सन्सचे माजी चेअरमन रतन टाटा यांचं वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना बुधवारी (९ ऑक्टोबर) मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपाचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

दरम्यान, रतन टाटांच्या निधनाचं वृत्त प्रसिद्ध होताच अनेक नेत्यांनी व कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवारांनी देखील रतन टाटांना श्रद्धांजली वाहिली आहे. पवारांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे.

या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की ‘जगभरात आपल्या गौरवास्पद कामगिरीतून देशाचा लौकीक वाढवणारे टाटा समूहाचे अध्यक्ष उद्योगपती रतन टाटा यांनी जगाचा निरोप घेतला. देशावर ओढवणाऱ्या नैसर्गिक अथवा मानवी अशा प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी सदैव मदतीचा हात देणे हा रतन टाटा यांचा स्वभाव सदैव स्मरणात राहील. सामाजिक जाणीवेतून आपल्या यशाचा राजमार्ग घडवणारे व्यक्तिमत्त्व रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली!’

Leave a Comment