पारनेर: विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच पारनेर नगर विधानसभा मतदारसंघात मोठ्या राजकीय घडामोडी सुरू झाल्या आहेत. महायुतीमध्ये हा मतदारसंघ अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे राहण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मतदारसंघात नवीन समीकरणे जुळवण्यास सुरूवात केली आहे.
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या सोबत माजी नगराध्यक्ष विजय औटी, माजी सभापती काशिनाथ दाते यांनीही घड्याळ हाती घेतले आहे. या पक्ष प्रवेशावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पारनेर मतदारसंघात सुजित झावरे हेच उमेदवार असतील असे स्पष्ट करून सर्वांना एकदिलाने काम करण्याचे आवाहन केले आहे.
सुजित झावरे यांनी याआधीही एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. दांडगा जनसंपर्क आणि जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असताना केलेली विकासकामे, नदीजोड सारखा प्रकल्प, सत्तेत नसतानाही विकासकामांसाठी आणलेला निधी या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. याशिवाय खा. लंके विरोधकांची मोट बांधण्यात ते यशस्वी झाले आहेत. भाजपकडूनही त्यांना तोलामोलाची साथ मिळणार असल्याने झावरे यांची उमेदवारी शरद पवार गटासाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे.
