पारनेर(DSNews24/किरण पुरी) पारनेर तालुक्यातील दुष्काळी गावांना उपसा सिंचन द्वारे पाणी मिळावे ही गेली ४० वर्षापासूनची मागणी आहे. निवडणुका आल्या की मोठ्या मोठ्या घोषणा होतात, मायबाप शेतकरी विश्वास ठेवून डोळे झाकून मतदान करतो. तालुक्यातील शेतकऱ्यांनी पाण्याच्या प्रश्नावर अलटून पालटून सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांना निवडून दिले पण गेल्या ४० वर्षात या योजनेला साधी मान्यता सुद्धा दिली गेली नाही.
लोकसभेपूर्वी पारनेर या ठिकाणी झालेल्या एका सभेत जेष्ठ शेतकरी वसंत शिंदे यांनी पाण्याच्या मुद्द्यावर लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला असता त्यावेळी अजित पवार यांनी जाहीर भाषणातून सांगितले होते की, एक वर्षाच्या आत उपसा सिंचन योजनेला मान्यता देऊन निधी टाकतो पण त्यावर अद्याप पर्यंत कुठलीही कार्यवाही झाली नाही. पाण्याचा मुद्दा हा फक्त निवडणुकीपुरताच आहे का? असा प्रश्न आता तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मनात उपस्थित झाला आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पारनेरमध्ये होणाऱ्या उद्याच्या सभेत शेतकऱ्यांचा अंत न पाहता भुमिका स्पष्ट करावी असे स्पष्ट मत भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संतोष वाडेकर यांनी व्यक्त केले.
दरम्यान पंधरा दिवसांपूर्वी संतोष वाडेकर यांनी पारनेर तालुक्याच्या दुष्काळी भागाला पाणी मिळावे यासाठी पारनेर येथे तहसील कार्यालयावर आमरण उपोषण केले होते.
