पुणे – नाशिक महामार्गावर कोठारी मारुती शोरूम समोर तीन वाहनांमध्ये झालेल्या विचित्र अपघातात गोळेगाव(ता. जुन्नर ) येथील अभियंता असलेल्या तरुणाचा मृत्यू झाला तर त्याच्या पत्नीसह सात जण जखमी झाले. हा अपघात रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास झाला. जखमींना उपचारासाठी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघातात आयटी अभियंता असलेले संजय लिंबाजी खंडागळे( वय 25 राहणार गोळेगाव,ता.जुन्नर जिल्हा पुणे) यांचा मृत्यू झाला असून त्यांची पत्नी कीर्ती संजय खंडागळे (वय 19) या गंभीर जखमी झाल्या आहेत.
अपघातातील इतर जखमींची नावे:
ऋतिका नामदेव कदम (वय 28 ), माया नामदेव कदम (वय 58) ऋषिकेश नामदेव कदम (वय 30), नामदेव भिवाजी कदम (59), रुचिका ऋषिकेश कदम (वय 27), चालक अझरुद्दीन काझी ( सर्व राहणार डीएसपी चौक अहिल्यानगर).
संजय खंडागळे हे सायंकाळी मोटारीने पत्नीसह नारायणगाव कडून मंचरच्या दिशेने जात होते. दरम्यान सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास मुसळधार पाऊस सुरू होता. महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साठले होते. पाण्याच्या प्रवाहामुळे खंडागळे यांचे मोटरी वरील नियंत्रण सुटले. त्यानंतर त्यांची मोटार डिव्हायडरला धडकून महामार्गाच्या विरुद्ध दिशेला पुणे कडून नारायणगाव कडे जाणाऱ्या दोन वाहनांना धडकली. या अपघातात ईरटीका गाडीतून पुणे येथून अहिल्यानगर येथे निघालेले चालक व एकाच कुटुंबातील पाच जण जखमी झाले. त्यांच्यावर नारायणगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
