नगरमध्ये अजितदादांना मोठा धक्का, दिग्गज नेत्याचा राजीनामा 

अहिल्यानगर : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पक्षांतराचे ग्रहण लागल्याचे दिसत आहे. कारण एकापाठोपाठ एक शिलेदार आपल्या मनगटावरील घड्याळ उतरवून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची तुतारी फुंकत आहे.

इकडे अहमदनगरमध्ये अजित पवार यांना जोरदार झटका बसला असून अनुराधा नागवडे यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देऊन विधानसभा लढण्याची घोषणा केली आहे.

राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला जिल्हाध्यक्ष अनुराधा नागवडे यांच्यासह राजेंद्र नागवडे यांनी पदाचा राजीनामा दिलेला आहे. अनुराधा नागवडे यांनी नगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. भारतीय जनता पक्षाकडून विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर अजितदादांना नागवडे यांच्या रुपाने मोठा धक्का बसला. श्रीगोंद्याची जागा भारतीय जनता पक्षाकडे असल्याने नागवडे यांनी अजित पवार गटाचा राजीनामा दिला.

अनुराधा नागवडे यांनी प्रतिभा पाचपुते यांच्याविरोधात लढण्याची घोषणा केल्याने येत्या विधानसभेत दोन्ही महिला उमेदवारांमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळेल, यात शंका नाही. किंबहुना पाचपुते आणि नागवडे हे पारंपारिक विरोधक देखील राहिलेले आहेत. शिवाजीराव नागवडे विरुद्ध बबनराव पाचपुते असा सामना नगर जिल्ह्याने पाहिलेला आहे. आता यापुढील महिला लढाईचा अंक अनुराधा नागवडे विरुद्ध प्रतिभा पाचपुते यांच्या रुपाने बघायला मिळणार आहे.

Leave a Comment