नाशिकच्या देवळाली विधानसभा मतदारसंघात महायुतीत (Mahayuti) अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने विद्यमान आमदार सरोज अहिरे यांना पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. तर महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाने माजी आमदार योगेश घोलप यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उपनेते बबनराव घोलप यांनी राजीनामा दिला आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेतील मिलिंद नार्वेकर यांच्यावर टीका करत बबनराव घोलप यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली होती. यानंतर त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. ठाकरेंची शिवसेना सोडत असताना अन्याय झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली होती. मात्र, ठाकरेंच्या शिवसेनेने मुलाला उमेदवारी दिल्याने बबनराव घोलप यांनी राजीनामा दिलाय. तर समाजाच्या आणि मतदारसंघातील कामांचा शब्दही न पाळल्याने बबनराव घोलप यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
बबनराव घोलपांचा राजीनामा
बबनराव घोलप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या राजीनाम्यात म्हटले आहे की, मी सहा एप्रिल रोजी आपल्या पक्षात प्रवेश केला होता. त्यात माझ्या समाजाच्या काही मागण्या मागितल्या होत्या व मतदारसंघात काही कामे करण्याचे मान्य केले होते. पण यापैकी एकही मागणी मान्य झाली नाही. त्यामुळे समाज फार नाराज झाला आहे. आता माझ्या मुलाला शिवसेनेने तिकीट देऊन माझ्यावर फार मोठे उपकार केले आहेत. म्हणून मी आपल्या शिवसेना (शिंदे गट) पक्षाचा राजीनामा देत आहे, असे बबनराव घोलप यांनी म्हटले आहे.
