मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी यंदा 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. त्यामुळे आता निवडणुकीची रणधुमाळी ही सुरु झाली आहे. पण याच दरम्यान, काल (25 ऑक्टोबर) सुजय विखे-पाटलांच्या जाहीर सभेत एक अत्यंत वादग्रस्त विधान करण्यात आलं. ज्याचा फटका आता महायुतीला बसणार का? अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
शुक्रवारी (25 ऑक्टोबर 2024) अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरमधील धांदरफळ येथे माजी खासदार, भाजप नेते, सुजय विखे पाटील यांची संकल्प सभा झाली. या सभेत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याबाबत अत्यंत अश्लाघ्य असं विधान करण्यात आलं. सुजय विखेंचे समर्थक, भाजपचे नेते वसंतराव देशमुख यांनी जयश्री थोरातांबद्दल बोलताना पातळी सोडली.
वसंतराव देशमुख बरळले, नेमकं ‘ते’ विधान काय?
‘त्यांची कोण ती.. नात काय ती.. बोलते ती म्हणतायत.. माझा सगळ्यांचा बाप.. माझा बाप सगळ्यांचाच बाप आहे म्हणे.. काय कळत नाही. अरे तुला सुद्धा पोरं कसे झालं प्रश्नय.. आपल्या कन्येला समजवा.. आपल्या कन्येला समजवा.. नाहीतर आम्ही इलेक्शन काळात मैदानात उतरलो तर तुमची मुलगी घराच्या बाहेर पडू शकणार नाही.’
‘तिला सुजय दादा प्रेमाने ताई म्हणतात.. बरोबर आहे.. त्यांची संस्कृती आहे ती पण दादा या ताईचं पराक्रम जर पाहिले ना.. सगळ्या तालुक्याला माहितीए..’ असं अत्यंत विकृत विधान हे वसंतराव देशमुखांनी यावेळी केलं आहे.
‘त्या’ विधानाचा महायुतीला बसणार फटका?
दरम्यान, वसंतराव देशमुख यांच्या याच विधानानंतर विरोधकांकडून महायुती आणि भाजपवर जोरदार टीका केली जात आहे. तसंच एकीकडे लाडकी बहीण योजना सुरू असताना दुसरीकडे महिलांवर अशा प्रकारची टीका केली जात असल्याचं म्हणत विरोधकांनी आता सत्ताधाऱ्यांना घेरलं आहे.
राज्यातील महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी महायुतीने आतापर्यंत वेगवेगळ्या योजना आणल्या आहेत. मात्र, महिलांबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने त्याचा निवडणुकीत जोरदार फटका बसू शकतो याची जाणीव होताच महायुतीच्या नेत्यांनी वसंतराव देशमुख प्रकरणी हात झटकले आहेत.
वसंतराव देशमुखांवर कारवाई करण्यात येईल असंही भाजप नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. पण असं असलं तरी या मुद्द्यावरून आता विरोधकांनी याबाबत प्रचारात रान उठविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता याचा निवडणुकीत नेमका काय परिणाम होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
