संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील साकूर येथील आराध्य दैवत असलेल्या श्री बिरोबा देवस्थान परिसराचे सुशोभीकरण व पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्यातून राज्य सरकारच्या प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत ५० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे बिरोबा देवस्थान परिसराचा विकास करण्याचा मार्ग खुला झाला आहे.
साकूर येथील श्री बिरोबाराया लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असून नगर, नाशिक, औरंगाबाद, कल्याण, ठाणे, पुण्यासह विविध जिल्ह्यांतून भाविक दर्शनासाठी येत असतात. तसेच या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी होत असते. त्यासाठी बिरोबा देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून भाविकांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच श्री बिरोबा देवस्थानच्या परिसराचा कायापालट, सुशोभीकरण, येथे येणाऱ्या भाविकांसाठी सोयी – सुविधा उपलब्ध करण्यासाठी विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांनी राज्याचे पर्यटन, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री ना. मंगलप्रभात लोढा यांच्याकडे श्री बिरोबा देवस्थानच्या सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी दि. ५ मार्च २०२३ रोजी पत्राद्वारे केली होती. आमदार तांबे यांच्या मागणीची तात्काळ दखल घेत मंत्री ना. मंगलप्रभात लोढा यांनी ५० लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यास मान्यता दिली असून याबाबतचा शासन निर्णय २९ मार्च २०२३ रोजी काढण्यात आला आहे. त्यामुळे श्री बिरोबा देवस्थानचा परिसर फुलणार आहे. तसेच मंदिर परिसरातील विकासाला गती येणार आहे.
नुकत्याच विधान परिषदेच्या निवडणुका पार पडल्या होत्या. सत्यजित तांबे यांनी या निवडणुकीत नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी दाखल करत निवडणूक लढवत विजयी झाले होते. त्यानंतर आमदार तांबे यांनी मतदारसंघात लक्ष केंद्रित करत विकासकामे, प्रश्न, समस्या, पर्यटन स्थळे, देवस्थान सुशोभीकरण, आदि विविध प्रश्नांबाबत संबंधित खात्याकडे पत्रव्यवहार केले.
दरम्यान, सत्यजित तांबे आमदार होण्याआधी साकूर जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषद सदस्य झाले होते. त्यावेळीही साकूर गटात विविध विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर केले होते. तसेच अनेक विकासकामे मार्गी लावले होते. परंतु आता सत्यजित तांबे आमदार झाल्याने पुन्हा साकूर गटावर लक्ष केंद्रित करत श्री बिरोबा देवस्थानचा कायापालट करण्यासाठी ५० लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर, साकूर सोसायटीचे चेअरमन इंद्रजित खेमनर, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष किशोर विरभद्र खिल्लारी, सचिव, सर्व सदस्य तसेच साकूर ग्रामस्थांनी आमदार सत्यजित तांबे यांचं कौतुक केले आहे.
