‘महायुतीचे नवं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी देणार.’, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज चंद्रपूरमध्ये केली. महायुतीचे चंद्रपूर क्षेत्राचे उमेदवार किशोर जोरगेवार यांच्या प्रचारार्थ आज चंद्रपूरमध्ये जाहीर सभा घेण्यात आली. या सभेदरम्यान बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली.
किशोर जोरगेवार हे २०१९ च्या निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आले होते. यावेळी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेत उमेदवारी मिळवली. या सभेला माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर, खासदार फॅग्गनसिंग कुलेस्ती यांची उपस्थिती होती. यावेळी फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेवरून काँग्रेसवर टीका केली. ‘काँग्रेस सत्तेत आली तर ही योजना बंद करेल.’, असे त्यांनी सांगितले. शिवाय, ‘महायुती सत्तेत आल्यास लाडक्या बहिणींना २१०० रुपये देऊ.’, अशीही घोषणा त्यांनी केली.
देवेंद्र फडणवीस यांनी धुळ्यातील प्रचारसभेदरम्यान देखील शेतकऱ्यांबाबत मोठं वक्तव्य केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत वक्तव्य केले. त्यांनी यावेळी सांगितले होते की, ‘तुमच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात आमचं सरकार आले की शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात येईल. या व्यतिरिक्त MSP पेक्षा भाव कमी झाल्यास भावांतर योजना राबवून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होतील.’ फडणवीसांच्या या घोषणेमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.
