संगमनेर(DSNews24/किरण पुरी) राज्याचे लक्ष लागून असलेल्या संगमनेर विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार प्रचार सुरू आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून महायुतीकडून अमोल खताळ व महाविकास आघाडीकडून बाळासाहेब थोरात निवडणूकीच्या रिंगणात आमनेसामने उभे आहेत. महायुतीचे उमेदवार अमोल खताळ तालुक्यातील गटा गटात जाऊन जोरदार प्रचार करत आहेत.
त्यामुळे मतदारांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळत आहे. दरम्यान तळेगाव दिघे येथील दिव्यांग असलेले विनायक गोपीनाथ कांदळकर हे अमोल खताळ यांच्या प्रचारासाठी अक्षरशः मैदानात उतरले आहेत. कारण काही दिवसांपूर्वी विनायक कांदळकर यांना अमोल खताळ यांनी विविध कामात मदत केली होती. त्याच कामाची परतफेड म्हणून अमोल खताळ यांना आमदार करण्यासाठी ते मतदारांकडे मतदान मागत आहे.
अक्षरशः संपूर्ण मतदारसंघात पायी प्रचार करत मतदारांपर्यंत पोहचत आहे. तसेच जिथे सायंकाळ होईल तिथेच ते मुक्काम करत आहे. विनायक कांदळकर यांच्या या प्रचारामुळे मतदारांचे लक्ष वेधून घेत आहे. गळ्यात छोटासा फ्लेक्स, पाठिवर पक्षाचा झेंडा, हातात बॅग घेऊन जीवाची तमा न बाळगता विनायक कांदळकर जोरदार प्रचार करत आहेत. त्यांच्या या प्रचारामुळे खरोखरच मतदारांमध्ये एक भावनिक परिस्थिती निर्माण झाली आहे.
