Maha Vikas Aghadi : आज (2 एप्रिल) छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) महाविकास आघाडीची जाहीर सभा होणार आहे.
सायंकाळी सहा वाजता सांस्कृतिक मंडळ मैदानवर ही सभा होणार आहे. या सभेसाठी महाविकास आघाडीचे सर्वच प्रमुख नेते उपस्थित राहणार असून, सभेला मोठी गर्दी जमण्याची शक्यता आहे. संभाजीनगरमध्ये नुकत्याच झालेल्या तणावग्रस्त वातावरणानंतर महाविकास आघाडीची ही पहिलीच सभा होत आहे. त्यामुळं या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलंय.
आजच्या या सभेसाठी आयोजकांकडून जय्यत तयारी केली जात असतानाच शहरातील किराडपुरा भागात घडलेल्या घटनेमुळं सभेला परवानगी मिळणार की नाही अशा चर्चा सुरु होती. पण अखेर पोलिस प्रशासनाने या सभेला सशर्त परवानगी दिली आहे.
आजच्या या सभेला शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह आघाडीचे नेते पदाधिकारी उपस्थित असणार आहे.
