संगमनेर (DSNews24/किरण पुरी) सहकार क्षेत्रात अग्रगण्य तसेच नगर जिल्ह्यात दोन नंबरची समजल्या जाणाऱ्या संगमनेर तालुक्यातील साकूर येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची सभासद पातळीवर १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ या आर्थिक वर्षात वाटप केलेले अल्प मुदत पीक कर्ज ३१ मार्च २०२३ पर्यंत ८२ टक्के तर बॅंक पातळीवर ९५.३० टक्के इतकी वसूली झाली असल्याची माहिती साकूर सोसायटीचे चेअरमन इंद्रजित खेमनर यांनी दिली आहे.
साकूर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीत दरवर्षी कोट्यावधींची उलाढाल होत असते. तसेच संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी सभासदांना १५ टक्के लाभांश वाटप केला जातो. १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ या आर्थिक वर्षात संस्थेच्या १०३२ सभासदांना १० कोटी ३९ लाख ८३ हजार ९४१ इतके अल्प मुदत पीक कर्ज वाटप करण्यात आले होते. यापैकी ७८६ कर्जदार सभासदांनी वेळेत कर्ज भरले असल्याने एकूण ८ कोटी ५२ लाख ६६ हजार ७९८ इतका वसूल झाला आहे. तसेच २४६ कर्जदार सभासदांची एकूण १ कोटी ८७ लाख १७ हजार १४३ इतकी थकबाकी असून सभासद पातळीवर संस्थेला ८२ टक्के वसुली करण्यास यश मिळाले आहे.
तसेच बॅंक पातळीवर एकूण ९ कोटी २६ लाख ६७ हजार ७३० इतकी रक्कम वसुलीस पात्र होती. यापैकी ८ कोटी ८३ लाख १९ हजार २६२ इतकी रक्कम वसुल झाली असून ४३ लाख ४८ हजार ४६८ एवढी रक्कम बँकेत वसुल देणे बाकी असून बॅंक पातळीवर जवळपास ९५.३० टक्के वसुली झाली आहे.
नगर जिल्ह्यातील दोन नंबरची तसेच सहकार क्षेत्रात अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या साकूर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीवर माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर यांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्षांपासून शेतकरी विकास मंडळाची सत्ता आहे. या सोसायटीचे चेअरमन इंद्रजित खेमनर यांच्या माध्यमातून संस्थेचा स्वच्छ कारभार पार पडत आहे.
संस्थेचे सचिव संजय कदम व कर्मचारी दत्तात्रय शेरमाळे, नाना कोळेकर, नाना आमले, सुभाष भुजबळ, भाऊसाहेब गावडे यांनी अहोरात्र मेहनत घेतल्यामुळेच संस्थेची ८२ टक्के वसुली झाली असून याचे सर्व श्रेय त्यांचेच आहे. तसेच उर्वरित २४६ थकबाकीदार कर्जदारांनी आपले कर्ज भरून संस्थेची १०० टक्के वसुली पुर्ण करण्यास सहकार्य करावे असे आवाहन चेअरमन इंद्रजित खेमनर यांनी केले आहे.
