संगमनेर(DSNews24/किरण पुरी) महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोमात सुरू आहे. अवघ्या तीन दिवसांवर मतदान येऊन ठेपल आहे. त्यामुळे प्रचाराचे शेवटचे दोन दिवस शिल्लक राहिले आहे. संगमनेर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून बाळासाहेब थोरात नवव्यांदा उमेदवारी करत आहे. सलग आठ वेळा संगमनेर तालुक्याचे नेतृत्व त्यांनी केले आहे. आता सलग नवव्यांदा निवडणूक येण्यासाठी मतदारसंघात जोरदार प्रचार, सभा चालू आहे.
साकूर गटावर गेल्या अनेक वर्षापासून कॉंग्रेसचा दबदबा आहे. याच साकूर गटात वार – रविवार दि. १७ नोव्हेंबर रोजी साकूर येथील ग्रामसचिवालयासमोर सायंकाळी ६ वाजता महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बाळासाहेब थोरात यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन केले आहे.
या सभेसाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहणार असून साकूरमध्ये त्यांची तोफ धडाडणार आहे. तसेच शरद पवार गटाचे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके, ठाकरे गटाचे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे देखील उपस्थित राहणार आहेत. दरम्यान खासदार सुप्रिया सुळे प्रथमच साकूरमध्ये येणार असल्याने सभेत नेमकं काय बोलणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान सभेची जय्यत तयारी सुरू आहे. संपूर्ण तालुक्यातून हजारोंच्या संख्येने नागरिक या सभेसाठी उपस्थित राहणार आहे. तसेच नागरिकांना बसण्यासाठी खास सुविधा केली जात आहे. तसेच विशेष मान्यवरांसाठी खास स्टेज ची उभारणी केली जात आहे. त्यामुळे या सभेकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
