भागलपूर : 12 नोव्हेंबरपासून भारतामध्ये लग्नाचा हंगाम सुरू झाला आहे, पण लग्नाच्या माध्यमातून फसवणूक होत असल्याचे अनेक प्रकारही घडत आहेत. लग्न झाल्यावर दुसऱ्याच दिवशी वधू घरातले दागिने आणि रोख रक्कम घेऊन पसार झाली आहे, यामुळे तरुणाला धक्का बसला असून त्याने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
बिहारमधल्या भागलपूरमध्ये ही घटना घडली आहे. शनिवारी एका राजस्थानी तरुणाचा वाजतगाजत विवाह झाला. वधू सासरी आली. सर्व विधी परंपरेनुसार पार पडले. त्यानंतर वधू-वर त्यांच्या खोलीमध्ये निघून गेले.
सकाळी नवऱ्या मुलाला जाग आली आणि वधू तिथं नसल्याचे पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली. तो तिला शोधत रूमच्या बाहेर आला, वधूचे कुटुंबीयदेखील तिथे नव्हते. घरातले दागिने आणि रोकड गायब झालेली होती. घडलेला प्रकार नवऱ्या मुलाच्या लक्षात आला. कुटुंबीयांसह तो पोलीस स्टेशनला गेला. त्याने वधू आणि तिच्या कुटुंबीयांविरुद्ध तक्रार नोंदवली.
तिलकामांझी पोलीस स्टेशनच्या हद्दीतल्या सच्चिदानंद नगर परिसरात ही घटना घडली. या भागात हे राजस्थानी कुटुंब राहत होतं. काही दिवसांपूर्वी या कुटुंबातल्या तरुणाचा एका तरुणीशी विवाह निश्चित झाला होता. एका मॅरेज हॉलमध्ये विवाह सोहळा पार पडला. शनिवारी वऱ्हाड वधूच्या घरी पोहोचलं. सर्व विधी पार पडले. सप्तपदी झाल्यावर तरुण त्याच्या पत्नीला घेऊन घरी परतला. त्याचे कुटुंबीय विवाहामुळे आनंदात होते. त्यांनी मोठ्या उत्साहात वधूचं स्वागत केलं. सर्व पारंपरिक विधी पार पडल्यावर लग्नाची पहिली रात्र होती; पण हा तरुण झोपी जाताच वधू सर्व मौल्यवान वस्तू घेऊन कुटुंबासह तेथून पसार झाली. पोलिसांनी वधूसह तिचे कुटुंबीय आणि मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
