मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी एकूण 288 जागांसाठी मतदान झाले. या पैकी तब्बल 132 जागांवर भाजपाने दणदणीत विजय नोंदवला आहे.
या जागांसह भाजपा हा राज्यातील सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. सलग तिसऱ्या निवडणुकीत भाजपाने 100 पेक्षा अधिक जागा मिळवल्या आहेत. या निवडणुकीत भाजपनंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा पक्ष दुसरा सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. या पक्षाला एकूण 57 जागा मिळाल्या आहेत. तर अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पक्षाला एकूण 41 जागांवर विजय मिळाला आहे.
विधानसभेच्या निकालानंतर आता मुख्यमंत्रिपदापासून मंत्रिमंडळाच्या फॉर्म्युलावर देखील महायुतीमध्ये चर्चा सुरु झाली आहे. महायुतीमध्ये मंत्रिमंडळाचा अंदाजित फॉर्म्युला 21, 12, 10 असा असू शकतो. यात भाजपला सर्वाधिक 21 मंत्रिपदे, त्यानंतर शिवसेनेला 12 आणि राष्ट्रवादीला 10 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे. ही प्राथमिक चर्चा असून यामध्ये प्राथमिक केलेली वाटाघाटी असल्याचं सांगण्यात येत आहे. यामध्ये आज तिन्ही मुख्य नेते आणि दिल्लीतील वरिष्ठ नेते यांच्याशी चर्चा करून बदल होऊ शकतो. मात्र सध्या तरी हा फॉर्म्युला विचाराधीन आहे.
