पुणे : पती-पत्नीची भांडणं टोकाला जाऊन प्रकरण थेट पोलीस स्टेशनला पोहोचल्याचं आपण अनेक वेळा पाहिलं आहे. अनेकवेळा पतीकडून पत्नीला किंवा पत्नीकडून पतीला मारहाण केली जाते, पण पुण्यात घडलेलं एक प्रकरण सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
मोड आलेले हरभरे खाल्ल्यामुळे पत्नीने पतीची बेदम धुलाई केली, यानंतर हा पती थेट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला. पुण्याच्या सोमवार पेठेमध्ये हा प्रकार घडला आहे.
सोमवार पेठेत राहणाऱ्या अमोल गुलाबराव सोनावणे या 44 वर्षांच्या इसमाने त्याच्या पत्नीविरोधात समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे, त्यानंतर पोलिसांनी पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रविवारी रात्री अमोल सोनावणे यांच्या सोमवार पेठेतील घरामध्ये पती-पत्नीचा वाद झाला.
रविवारी रात्री अमोल सोनावणे आणि त्यांची पत्नी घरी होते, तेव्हा अमोल यांनी घरात असलेले मोड आलेले हरभरे खाल्ले, त्यामुळे त्यांची पत्नी संतापली. एवढच नाही तर तिने पतीला शिवीगाळ केली, यानंतर तिने पतीला लाटण्यानेही मारलं. अमोल सोनावणे यांनी लाटणं हिसकावून घेतलं तेव्हा पत्नीने मिक्सरच्या भांड्याने दोनदा डोक्यात मारलं. तसंच नखांनी पतीच्या शरिरावर बोचकारलं.
पत्नीने पतीची पॅन्ट खाली खेचल्यानंतर अमोल सोनावणे खाली बसले, यानंतर पत्नीने त्यांच्या हाताच्या करंगळीचा चावा घेतला, यात त्यांचं नख तुटलं. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
