महिला वर्गांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे लवकरच महिलांच्या खात्यावर जमा होणार आहेत. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे पाच हफ्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत.
तर आता डिसेंबरचा हफ्ता येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे अशी माहिती भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.
ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती. राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर लगेचच या योजनेची अंमलबजावणी सुद्धा झाली. जुलैपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली. या योजनेंतर्गत दर महिन्याला दीड हजार रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात येतात.
तसेच ज्या लाडक्या बहिणींनी अर्ज केले होते. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे किंवा इतर काही कारणांमुळे त्यांना अजून एकही रुपया मिळाला नव्हता, अशा महिलांच्या खात्यामध्ये थकीत पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. शुक्रवारपासून महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे महिला वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
