पुणे : भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या अपहरणामुळे पुण्यात खळबळ उडाली होती. ज्याची भीती होती तीच बातमी आता समोर आली आहे. यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत सतीश वाघ यांचा मृतदेह सापडला आहे. आज पहाटे त्यांचं अपहरण झालं होतं. संध्याकाळी त्यांचा मृतदेह सापडला आहे. त्यामुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.
भारतीय जनता पक्षाचे पुण्यातील विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे सख्खे मामा सतीश सातबा वाघ यांचं आज पहाटे पुण्यातून अपहरण करण्यात आलं होतं. सतीश वाघ हे मांजरी परिसरात राहण्यासाठी आहेत. आज पहाटेच्या सुमारास ते मॉर्निंग वॉक करण्यासाठी घराबाहेर पडले होते. घरापासून काही अंतरावर जातात दबा धरून बसलेल्या चार जणांनी त्यांना जबरदस्तीनं एका चार चाकी गाडीत बसवलं आणि अपहरण करून घेऊन गेलं.
संध्याकाळी ग्रामीण पोलिसांना यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाघ यांचा मृतदेह आढळून आला आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बातमीला दुजोरा दिला आहे. सकाळपासून पोलिसांच्या वेगवेगळ्या टीम वाघ यांचा शोध घेत होते. खुद्द अमितेश कुमार हे हडपसर पोलीस स्टेशनमध्ये दिवसभर बसून होते. शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. पण दिवसभरात वाघ यांचा काहीच ठिकाणा लागला नाही.
संध्याकाळी ग्रामीण पोलिसांना वाघ यांचा मृतदेह आढळून आला. वाघ यांचं अपहरण का करण्यात आला, त्यांची अपहरणकर्त्यांनी हत्या का केली, याचं गुढं वाढलं आहे. विधान परिषदेच्या आमदाराच्या मामाचं अपहरण आणि हत्येमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
