छगन भुजबळ उपमुख्यमंत्री होणार?

महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार रविवारी झाला. या विस्तारात एकूण ३९ आमदारांना मंत्री म्हणून स्थान देण्यात आले. त्यामुळे मंत्रिमंडळाची संख्या ४२ वर गेली आहे. 

भाजपच्या कोट्यातील एक मंत्रीपद रिक्त आहे. या विस्तारानंतर तिन्ही पक्षातील नाराजीनाट्य समोर येऊ लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते आणि ओबीसी नेते छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा आहे. त्याचवेळी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी महत्वाचे विधान केले आहे. भुजबळ उपमुख्यमंत्री होणार असल्याचा विश्वास त्यांनी ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना व्यक्त केला.

काय म्हणाले लक्ष्मण हाके

ओबीसी नेते असलेले लक्ष्मण हाके म्हणाले, छगन भुजबळ, गोपीचंद पडळकर या ओबीसी नेत्यांना मंत्रीपद हवे होते. ओबीसींची ठाम भूमिका घेणारी माणसे मंत्रिमंडळात हवी होती. या संदर्भात मी भुजबळ साहेबांशी बोलणार आहे. आता भुजबळ साहेबांना मंत्रिपद मिळाले नाही. परंतु कदाचित त्यांना उपमुख्यमंत्री करण्यात येईल, असा सकारात्मक विचार आम्ही करत आहोत. ओबीसींचे आंदोलन सक्षमपणे महाराष्ट्रात आम्ही उभे करणार असल्याचे त्यांनी म्हटले.

Leave a Comment