अरे देवा! दारूच्या नशेत मुलगा बापाला चावला, पठार भागातील घटना 

संगमनेर(DSNews24/सतिश फापाळे)  तालुक्यातील पठार भागातील सारोळे पठार येथे मद्यपान करून आलेल्या मुलाने आई _ वडिलांना धक्काबुक्की करत शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केली. तर बापाचे डावे हाताचे करंगळी जवळील बोट तोंडात घेऊन बोटाचा एक पेरा दाताच्या सहाय्याने तोडला. तसेच आई वडिलांना जिवे मारण्याची धमकी दिली आहे. रविवार दि २ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास हा खळबळजनक प्रकार घडला आहे.

अधिक माहिती अशी की, सारोळे पठार गावात ५८ वर्षीय शेतकरी गंगाधर मुक्ताजी घुले व त्यांची पत्नी रंजना व मोठा मुलगा गणेश ऊर्फ अमोल असे एकत्रित राहणेस आहे. तर त्यांचा लहान मुलगा राहूल हा त्याचे परीवारासह पुणे येथे वास्तव्यास आहे. गणेश याचे लग्न झालेले नसुन तो दारूचा अतिव्यसनी आहे. तो काही एक कामधंदा करीत नसून उलट घुले व त्यांचे पत्नीस नेहमी शिवीगाळ, दमदाटी करत वेळप्रसंगी मारहाण देखील करत असतो. त्यास घुले तसेच नातेवाईकांनी अनेकदा समजावून सांगुनही तो त्याचे वर्तनात काही एक सुधारणा करत नाही.

रविवार दि.२ एप्रिल रोजी सायं. ६ वाजताचे दरम्यान घुले यांचा आलेला लहान मुलगा राहुल यास वरूडी फाटा येथे सोडून परत घरी आले होते.यावेळी मुलगा गणेश ऊर्फ अमोल हा मद्यधुंद स्थितीत त्याचे आईस तथा घुले यांची पत्नी रंजना हिस वाईट वंगाळ शिवीगाळ करत तीला धक्काबुक्की करत घरावर दगडी मारीत होता. तसेच घरातील गॅसचे बटन चालू करून ठेवले होते.

घुले गेल्यानंतर त्यास तु काय करतो असे विचारले असता त्याने त्यांना शिवीगाळ, दमदाटी करून धक्काबुक्की केली. तर मोटार सायकलवर दगडी फेकु लागला म्हणून घुले पुन्हा त्याचेकडे गेले असता त्याने मला पुन्हा शिवीगाळ व दमदाटी करून धक्काबुक्की केली व त्याने घुले यांचे डावे हाताचे करंगळी जवळील बोट तोंडात घेऊन बोटाचा एक पेरा दाताचे साहाय्याने तोडला. बोट तुटल्यानंतर त्याने घुले यांचे पत्नीसह धक्काबुक्की करून दोघांनाही जीवे मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी गंगाधर मुक्ताजी घुले यांचे फिर्यादी नुसार मुलगा गणेश ऊर्फ अमोल गंगाधर घुले यांचे विरूध्द घारगाव पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शन नुसार पो. ए. आर.गांधले करत आहे.

Leave a Comment