कुत्र्याच्या चुकीमुळे मालकाची वाढली डोकेदुखी, पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, संगमनेरमधील प्रकार 

संगमनेर – तुमच्याकडे पाळीव कुत्रा आहे, त्याला फिरायला नेताय तर सावधान. तुमच्या श्वानाची एक चूक तुम्हाला महागात पडू शकते. बऱ्याचवेळा धावत्या बाईक मागे किंवा कारमागे कुत्रे धावत सुटत असतात, अशावेळी बाईक चालक भीतीमुळे वाहनाचा स्पीड वाढवतात. त्यामुळे अपघात घडतात. श्वानाची ही चुकी मालकांसाठी डोकेदुखी वाढवणारी ठरू शकते.

अहिल्यानगरमध्ये अशीच घटना घडलीय, एका श्वानाच्या चुकीमुळे मालकावर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय. महिलेच्या अपघातास कारण ठरल्याने एका पाळीव कुत्र्याच्या मालकावर गुन्हा दाखल झालाय. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर शहरात ही घटना घडलीय.

पोलीस फिर्यादीत आरोपीच्या नावापुढे डॉ. पानसरे यांचा पाळीव कुत्रा असे नमूद करण्यात आल्याने सुरुवातीला कुत्र्यावर गुन्हा दाखल झाल्याचा गैरसमज झाला होता. मात्र हा गुन्हा कुत्र्याच्या मालकावर दाखल झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केलंय. संगमनेर येथील घुलेवाडी परिसरातील स्वाती शिंदे या 15 जानेवारी रोजी दुचाकीवरून जात असताना तेथे राहणारे डॉ. पानसरे यांचा रॉटविलर जातीचा पाळीव कुत्रा अचानक गेट मधून त्यांच्या दिशेने जोरात धावत आला.. त्यामुळे घाबरेल्या स्वाती शिंदे यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि त्या स्कूटीसह कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळल्या.

या अपघातात स्वाती शिंदे यांना गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या जबाबावरून पाळीव कुत्र्याचे मालक डॉ. पानसरे यांच्यावर संगमनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.तर माझ्या पत्नीला भरपाई मिळावी, अशी मागणी महिलेचे पती कालिदास शिंदे यांनी केली आहे.

Leave a Comment