संगमनेर (DSNews24) तालुक्यातील साकूर येथील विद्या प्रबोधिनी शैक्षणिक संकुल हे नेहमीच आपले वेगळेपण सिद्ध करत असते. त्याचप्रमाणे थोरात कारखान्याचे संचालक व संस्थेचे अध्यक्ष इंद्रजीत पा. खेमनर यांनी मागील वर्षी एक संकल्पना मांडली की विद्यालयातील झेंडावंदन हे सैन्यातील जवानाच्या हस्ते करायचे. त्याचाच एक भाग म्हणून आज विद्यालयातील झेंडावंदन हे विद्यालयाचा माजी विद्यार्थी व सध्या सिक्कीम मधील नातू येथे कार्यरत असणारा जवान हर्षल भाऊसाहेब चितळकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सर्व विद्यालयात व ग्रामस्थांमध्ये एक प्रकारचे उत्साहाचे वातावरण होते. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी समूहगीत सादर केले तसेच समूह नृत्यही सादर केले. भारतीय जवानांप्रती आदर म्हणून जवानांच्या हस्ते झेंडावंदन करणे या संकल्पनेचे सर्वत्र कौतुक होत आहे. या झेंडावंदनासाठी ग्रामस्थ तसेच पालक व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
