राज ठाकरे म्हणाले बाळासाहेब थोरातांचा १० हजार मतांनी पराभव…..

मुंबई: विधानसभा निवडणुकीत स्वबळावर निवडणूक लढवलेल्या राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागले. निवडणुकीतील पराभवानंतर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच थेट भाष्य केले.

कल्याण मतदारसंघात राजू पाटलांचे गाव आहे. त्या गावात 1400 मतदान आहे. या गावातील सगळीच मते त्यांना मिळतात. आधी त्यांचा भाऊ निवडणुकीला उभा होता. त्यावेळीही सगळी मते मिळाली. राजू पाटलांनाही सगळी मते मिळत होती. लोकसभेतही मते मिळाली. मात्र, विधानसभा निवडणुकीत त्या गावात त्यांना एकही मत मिळाले नाही. ज्या गावातून राजू पाटलांना 1400 पैकी सगळी मते मिळायची आता निवडणुकीत एकही मत मिळाली नाही. संभाजीनगरमध्ये नगरसेवकपदासाठी 5500 मते घेतलेल्या उमेदवाराला विधानसभेतही तेवढीही मते नाही मिळाली. विधानसभेत सात वेळेस 50 ते 60 हजार मतांनी जिंकणारे बाळासाहेब थोरात यांचा 10 हजार मतांनी पराभव होतो, असे राज ठाकरे यांनी मतदानावर, ईव्हीएम शंका उपस्थित केली.

पराभव झाल्याने राज ठाकरे बोलतोय असं काही जण बोलतील. पण, मीच नाही तर सगळा महाराष्ट्र बोलतोय असेही राज यांनी म्हटले. काही विजयी उमेदवारांनाही निकालावर विश्वासही बसत नाही. अनेकजण अजूनही चिमटा काढून आपण विजयी झाले आहोत ना, असे विचारताना दिसत असल्याचे राज यांनी म्हटले.

राज ठाकरे यांनी निकालावर प्रश्न उपस्थित करताना म्हटले की, अजित पवारांना 42 जागांवर विजय मिळाला यावर कोणाचा तरी विश्वास बसेल का. ज्यांच्या जीवावर त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राजकारण केले, त्या शरद पवारांना 10 जागा मिळतात, हे सगळं समजण्या पलिकडील असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले. 13 खासदार आलेल्या काँग्रेसचे 15 आमदार येतात. लोकसभेत एक खासदार आलेल्या अजित पवारांना 42 जागा मिळतात, अवघ्या 6 महिन्यात लोकांचे इतकं मतपरिवर्तन होईल का, असा सवालही त्यांनी केला.

राज ठाकरे यांनी म्हटले की, निकालावर जाऊ नका, लोकांना आपल्याला मतदान केलेले आहे. पण आपल्यापर्यंत ते आले नाही. ते मतदान गायब झाले. अशा प्रकारे निवडणूका होणार असतील तर निवडणुका न लढवलेल्या बऱ्या अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. मात्र, सदैव सगळी परिस्थिती कायम राहत नाही असेही त्यांनी म्हटले.

Leave a Comment