एकनाथ शिंदेंचा ठाकरे गट आणि कॉंग्रेसला मोठा धक्का, मध्यरात्रीच…..

विधानसभा निवडणुकीच्या वेळेस मध्य नाशिकची जागा ठाकरे गटाला सोडल्याने नाराज असलेल्या काँग्रेस सरचिटणीस आणि प्रदेश प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील यांनी मंगळवारी रात्री दिल्ली येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या दिल्लीत आहेत. याच ठिकाणी हा पक्षप्रवेश करून शिंदेनी काँग्रेसला धक्का दिला आहे. 

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी उमेदवारी मिळून त्यांनी भाजप आमदार देवयानी फरांदे यांना चांगली टक्कर दिली होती. या निवडणुकीत हेमलता पाटील यांना उमेदवारी न देऊन ती जागा ठाकरे गटाचे नेते वसंत गीते यांना दिली असल्याने त्या नाराज होत्या. तसेच ऐनवेळी ठाकरे गटाने एबी फॉर्म देऊनही आपली उमेदवारी हिसकावून घेतली असा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर काही दिवसातच त्यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला.

हेमलता पाटील या १९९६ मध्ये महापालिकेच्या पोटनिवडणुकीत अपक्ष नगरसेविका म्हणून निवडून आल्या. नंतर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करून प्रदेश प्रवक्ता म्हणून कार्यरत होत्या. यंदाच्या निवडणुकीत त्यांना शब्द देऊनही ती जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सोडल्याने त्या नाराज होत्या. त्यानंतर त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्या कोणत्या पक्षात जाणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळात होती. अखेरीस त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

Leave a Comment